जीवनात पौर्णिमेचे महत्व खूप आहे. आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हणतात. चैत्रातील पौर्णिमेला हनुमान जयंती, वैशाखातील बुद्ध पौर्णिमा , जेष्टातील वटपौर्णिमा. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्या नक्षत्राचे नाव त्या मराठी महिन्याला असते. आजची गुरु पौर्णिमा ही जीवनात समत्व उत्पन्न व्हावे ह्यासाठी. आपल्याला योग्य मार्गावरून जाण्यासाठी , मार्ग दाखवण्यास सतगुरु असतात. इंद्रिय गोचर नसलेले ज्ञान प्राप्त करण्यासाठी गुरुतत्त्व तुम्हास मदत करते. आणि त्या तत्वाप्रती आदर व्यक्त करण्यासाठी , स्मरण करण्यासाठी ही आजची गुरुपूर्णिमा.
शिष्य उत्तम असला तर गुरु भेटतोच. आजकाल पंचतारांकित गुरु खूप आहेत.आजचा गुरु हा संस्थानिक असतो, व्यावसाईक असतो, अशा गुरूंची भेटही मिळत नाही. तुम्ही त्यांना दुरून पाहता. त्यांचे दूरदर्शनवर,सीडी वर तुम्हाला दर्शन होते. तुम्ही जर वलयांकित असाल, धनवान असाल, सत्तेच्या खुर्चीत असाल, तरच तुम्ही उपयोगाचे असता. आजचे आधुनिक गुरु तुम्हाला जवळ बसवून घेतील. तुम्हाला बाजूला बसवून घेतलं म्हणून तुम्ही मोठे ठरत नाही. त्यांच्या जवळच्या वर्तुळात तुम्हाला प्रवेश मिळणार नाही.
एक गोष्ट आठवली ती थोडक्यात सांगतो.................
एकदा एका सम्राटाला कोणीतरी प्रश्न केला "महाराज तुम्ही एवढे चक्रवर्ती सम्राट तुमच्यापाशी अमाप धन संपत्ती, समृद्ध राज्य, सेना,असून तुमचे गुरु इतके गरीब का?" त्यांच्याकडे ना जमिनीचा तुकडा, ना धन, ना रथ, ना घोडा, ना बैलगाडी आणि तुम्ही त्याच्यापुढे नतमस्तक होता. त्यांचे म्हणणे ऐकून घेता, तुम्ही त्यांना राजवाड्यांत का बोलावत नाही? " तेव्हा तो सम्राट म्हणाला " तुम्ही जी भूमी म्हणता ती युद्धात मी कधीही हरू शकतो, संपत्ती म्हणता ती खर्च होऊ शकते, नाहीशीही होऊ शकते आणि सामर्थ्य म्हणता ते जोपर्यंत तारुण्य आहे तोपर्यंतच. माझ्या गुरूंकडे जे ज्ञान आहे, ते ज्ञान त्या चैतन्याचा प्रकाश सर्वत्र पसरतो आहे. अनेक लोकांना योग्य मार्ग माझ्या सत्गुरुने दाखवलेला आहे. आणि ते सारे त्या मार्गाने जात आहेत. माझ्या गुरूकडे जे ज्ञान, जे प्रेम, जी करूणा आहे , ती सारी अनमोल रत्नच आहेत."
खरच आज अशा सत्गुरुची आणि चांगल्या शिष्यांची वानवाच आहे !
No comments:
Post a Comment